मुंबई - सलमान खानच्या बहुचर्चित दबंग-३ या चित्रपटातील नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. 'हुड हुड दबंग' असे शीर्षक असलेले गाणे, सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, मात्र त्याच्या लोकप्रियतेसाठी नाही, तर त्यावर होणाऱ्या टीकेमुळे. या गाण्यात हिंदू साधू-संतांचा अपमान केल्याची टीका करण्यात येत आहे.
या गाण्यामध्ये अभिनेता सलमान खान सोबत नृत्य करणाऱ्या कलाकारांनी नागा साधूंची वेशभूषा केली आहे. त्यामुळेच हे गाणे वादात आले आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर, साधू-संतांना नाचताना दाखवल्यामुळे अनेक लोक नाराज झाले आहेत. ट्विटरवर 'बॉयकॉट दबंग ३' अशा हॅशटॅगच्या माध्यमातून लोक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
हिंदू संतांचा असा अपमान सहन केला जाणार नाही. बॉलिवूड हे हिंदू धर्मालाच कायम लक्ष्य करत आले आहे, अशी टीकादेखील 'पीके' आणि 'ओ माय गॉड' या चित्रपटांचे उदाहरण देत केली जात आहे.
तर, सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समिती करत आहे. सलमान खानने ज्याप्रकारे साधू संतांना नाचताना दाखवले आहे, त्याप्रमाणेच तो मौलवी किंवा पादरी यांना नाचताना दाखवेल का? असा प्रश्नही या समितीने उपस्थित केला आहे.
दबंग सीरीजमधला तिसरा चित्रपट दबंग-३ हा २० डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. प्रभूदेवा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी दबंग आणि दबंग-२ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवला होता. त्यानंतर दबंग-३चे चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. त्यामुळे दबंग-३ देखील बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : 'दबंग' म्हणजे नक्की काय? भाईजानने दिलं उत्तर