मुंबई - अभिनेत्री कोयना मित्रा अडचणीत सापडली आहे. मुंबईच्या मेट्रोपेलिटन न्यायालयाने तिला ६ महिन्याचा तुरुंगवास सुनावला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात ती दोषी आढळली होती. कोयनाने मात्र तिच्यावरचा आरोप फेटाळला असून उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतलाय.
मेट्रोपोलिटन न्यायालयाने तिला मॉडेल पूनम सेठीच्या तक्रारीवरुन कोयनाला ४ लाख ६४ रुपये आणि त्यावर व्याज म्हणून १ लाख ६४ हजार रुपये व्याज म्हणून देण्याचे सांगितले. कोयनाने २०१३ मध्ये पूनमला चेक दिला होता. मात्र खात्यावर पैसे नसल्यामुळे हा चेक बाऊन्स झाला होता. त्यानंतर पूनमने केस दाखल केली होती.
पूनम सेठीने कोयनाला २२ लाख रुपये उधार दिले होते. हे पैसे परत करण्यासाठी कोयनाने तिला ३ लाख रुपयांचा चेक दिला. मात्र तो चेक बाऊन्स झाला. त्यानंतर तिने तक्रार दाखल केली होती. असे असले तरी कोयनाने आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. पूनमकडे उधार देण्याची क्षमताच नसल्याचे तिने म्हटलंय. पूनमने आपले चेक्स चोरल्याचे म्हटले आहे.
कोयनाचा हा पहिला तर्क न्यायालयाने फेटाळला आहे. दुसऱ्या तर्कानुसार कोयना चेक चोरल्याचा मुद्दा न्यायालयाला पटवून देऊ शकली नाही. न्यायालयाने म्हटले की कोयनाला मिळालेल्या नोटीसीमध्ये याचा उल्लेख तिने केला नव्हता. तसेच यावर तिने पुढे जाऊन कोणतीही कृती केली नव्हती.