मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील ऑर्किड ब्रिज या इमारतीत तीन फ्लॅटच्या अंतर्गत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने ५ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ५ फेब्रुवारीपर्यंत या अनधिकृत बांधकाम प्रकरणी कंगनाला मुंबई महानगरपालिकेसोबत संवाद साधून बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करण्याबद्दलचे अर्ज करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
तीन फ्लॅटमध्ये बदल करून केले होते अनधिकृत बांधकाम
दरम्यान अभिनेत्री कंगना राणावत तिच्या खार परिसरात असलेला ऑर्किड ब्रिज या इमारतीतल्या तीन फ्लॅट मध्ये बदल करून हे तिन्ही फ्लॅट अनधिकृत बांधकामाद्वारे एकत्र करण्यात आल्याचा आरोप मुंबई महानगरपालिकेने केलेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून अभिनेत्री कंगना रणौत हिला २०१८ मध्ये नोटीसही बजावण्यात आली होती. त्याच्या विरोधात अभिनेत्री कंगना हिने मुंबई महानगरपालिकेच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान अभिनेत्री कंगनाच्या कडून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करावा, असे निर्देश देत ५ फेब्रुवारीपर्यंत पालिकेने कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत.