मुंबई - बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी दिग्दर्शित केलेले नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस आढळल्याने त्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे. पुढील 24 तास त्यांच्यासाठी काळजीचे असल्याचे त्यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितले.
रेमो यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सूरु केली. अनेक सुपरहिट गाण्यासाठी त्यांनी कोरिओग्राफी केली. मात्र, त्यानंतर त्यांनी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरुवात केली. स्ट्रीट डान्सर, एबीसीडी, एबीसीडी 2, फ्लाईंग जठ, आशा काही सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. याशिवाय काही डान्स रिअलिटी शोचचं परीक्षण त्यांनी केलं आहे. यात डान्स इंडिया डान्स, डान्स प्लस आणि झलक दिखला जा यासारख्या डान्स शोजचा समावेश आहे.
लाखो चाहत्यांची अपेक्षा -
आपल्या कारकिर्दीत डान्सवर आधारित संपूर्ण सिनेमे बनवणारा दिग्दर्शक, अशी स्वतंत्र ओळख त्यांनी तयार केली. याशिवाय धर्मेश पलांडे, शक्ती, पुनीत यासारख्या डान्स शोजमधून पुढे आलेल्या अनोळखी चेहऱ्यांना नवी ओळख मिळवून देण्यात रेमो यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा डान्स फ्लोअरचा ताबा घ्यावा, अशीच त्यांच्या लाखो चाहत्यांची अपेक्षा आहे.