मुंबई - अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू दुबईच्या हॉटेलमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीत झाला होता. बाथटबमध्ये बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल दुबई पोलिसांनी दिला होता. असे असले तरी केरळचे डीजीपी ऋषिराज सिंह यांनी हा अपघाती मृत्यू नसून मर्डर असल्याचे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. यामुळे श्रीदेवीचा मृत्यू अपघात की घातपात या विषयावर पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.
डीजीपी ऋषिराज सिंह यांनी आपल्या कॉलममध्ये असे लिहिले होते, "माझे मित्र आणि दिवंगत फॉरेन्सिक तज्ञ डॉ. उमादातन यांनी खूप मला आधीच श्रीदेवीचा मृत्यू अपघाताने झाला नसल्याचे सांगितले होते. एक उत्सुकता म्हणून त्यांना हा मी प्रश्न विचारला होता. तेव्हा ही गोष्ट त्यांनी मला सांगितली.
"त्यांनी काही विशिष्ट वास्तवदर्शी मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपल्या दाव्यात केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीही नशेत असले तरीदेखील एक फूट पाण्यात ती व्यक्ती बुडू शकत नाही. जर कोणीतरी त्या व्यक्तीचे दोन्ही पाय पकडून डोके पाण्यात दाबल्याशिवाय ती व्यक्ती बुडू शकत नाही.", असे लिहित केरळचे डीजीपी ऋषिराज सिंह यांनी श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत.
याबाबतीत श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांना ऋषिराज सिंह यांच्या विधाना बाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अशा तथ्यहीन गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नसल्याचे सांगितले. अशा प्रकाराच्या कथा येत राहतील, या सर्व गोष्टी काल्पनिक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीदेवी यांचा अचानक मृत्यू सर्वांच्या जीवाला चटका लावणारा होता. २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये ही बातमी कळताच संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. तिचे चाहते आणि कुटुंबिय अजूनही या धक्क्यात आहेत. अशा वेळी जेव्हा तिचा मृत्यू हा अपघात की घातपात याविषयावर चर्चा सुरू होते. तेव्हा असंख्य प्रश्न निर्माण होतात. हा मृत्यू दुबईत झाला होता त्यामुळे या मृत्यूच्या बाबतीत पुन्हा तपास होऊ शकतो का? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.