मुंबई - समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह याच्या जीवनावर आधारित चरित्रपट रिलीज होणार आहे. यात मुलायम सिहांची भूमिका अमित सेठी साकारणार आहे. लॉकडाऊनच्या काळात या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. आता याचे दुसरे पोस्टर रिलीज झाले असले तरी प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री 'मुलायम सिंह यादव' यांचा जीवनसंघर्ष या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. एक शाळेतील शिक्षक ते मुख्यमंत्री असा अचाट प्रवास केलेल्या मुलायम सिंहांची अद्भूत कथा यात पाहायला मिळेल. त्यांच्या संघर्षाच्या काळातील आंदोलने, १९ महिन्यांचा तुरुंगवास, मजबूत संघटन कौशल्य आणि अविरत चळवळ पडद्यावर झळकणार आहे.
या चित्रपटात मिमोह चक्रवर्ती, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, सुप्रिया कार्णिक, जरीना वहाब, सना अमीन शेख आणि प्रेरणा सेठी मोंडल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा - सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' 'इथं' होणार रिलीज
रिलीज करण्यात आलेल्या पोस्टवर नेताजींच्या भूमिकेतील अमित सेठी गर्दीकडे हात उंचावून उभे असलेले दिसतात. यामध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे चित्रही दिसते. हा चित्रपट यावर्षीच्या शेवटी रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.