मुंबई - 'बिग बॉस'चा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा होते, ती म्हणजे घरात तयार होणाऱ्या ग्रुप्सची. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीजनलाही नुकतीच सुरुवात झाली आहे. या सीजनमध्येही लगेचच ग्रुप्स तयार होताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीजनचा पहिला ग्रुपही तयार झाला आहे.
खरे तर 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीजन मध्ये सई, पुष्कर आणि मेघा यांचा ग्रुप तयार झाला होता. नंतर त्यांच्या ग्रुपमध्ये शर्मिष्ठाची भरती झाली होती. या ग्रुपमध्ये बरीच भांडणं, वाद, गैरसमज झाले. तरीही ते एकत्र होते. तर, दुसरीकडे रेशम, सुशांत, राजेश, आस्ताद यांचा ग्रुप देखील बराच चर्चेत राहिला होता. या दोन ग्रुपने मिळून पहिल्या सिझनची रंगत चांगलीच वाढवली होती.
आता 'बिग बॉस मराठी सिझन २' च्या पहिला ग्रुप तयार होताना दिसणार आहे. 'KVR' असे नाव असलेल्या या ग्रुपमध्ये किशोरी शहाणे, विणा जगताप आणि रुपाली भोसले यांचा समावेश आहे. याच बरोबर त्यांनी गप्पा मारण्यासाठी एक जागा देखील ठरवून ठेवली आहे. या जागेला 'KVR कट्टा' असे नाव देखील ठेवले आहे.
आता या ग्रुपमध्ये अजून कोणाचा समावेश होईल का? या तिघींचा ग्रुप शेवटपर्यंत टिकून राहील का? की घरातील बदलत्या समिकरणासोबत ग्रुपमधील समीकरणही बदलतील हे बघणे मोठं रंजक असणार आहे.