मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या हटके चित्रपटांसाठी ओळखला जातो. मध्यमवर्गियांचा 'हिरो' म्हणून तो लोकप्रिय झाला आहे. आजवर त्याने एकापाठोपाठ एक बरेच हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आता त्याला अॅक्शन चित्रपटात भूमिका साकारण्याची इच्छा आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या अॅक्शन चित्रपटात काम करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली आहे.
आयुष्मान खुराना सध्या त्याच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान त्याने माध्यमांशी संवाद साधला.
'एखाद्या चित्रपटाची कथा मनोरंजक वाटली की त्यामध्ये भूमिका साकारावी की नाही हा विचार मी करत नाही. सिनेमागृहात प्रेक्षकांचे २ ते ३ तास कसे मनोरंजन होईल हे जास्त महत्वाचे असते. सध्या मी एखाद्या अॅक्शनपटात भूमिका साकारण्याचा विचार करत आहे. हा माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा अनुभव असेल. मात्र, रोहित शेट्टीसोबत अॅक्शन चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली, तर मी नक्की भूमिका साकारेल', असे आयुष्मानने म्हटले आहे.
हेही वाचा -...अखेर रिंकूची 'ही' इच्छा झाली पूर्ण, शेअर केला फोटो
आयुष्मानचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' उद्या म्हणजेच २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटानंतर तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुलाबो सिताबो' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटानंतरही तो त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. एका वर्षात तीन चित्रपट पुरेसे असल्याचे आयुष्मानने म्हटले आहे.
हेही वाचा -वडील आणि मुलीमधले भावबंध उलगडणारं 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित