मुंबई - हॉलिवूडचा 'अॅव्हेंजर्स एंडगेम' पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगसाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर गर्दी केली आहे. मात्र, हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याला पायरसीचे ग्रहण लागले आहे. या चित्रपटातील काही दृश्यांच्या व्हिडिओच्या लिंक्स इंटरनेटवर शेअर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट लिक होण्याची भीती दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.
'तमिळ रॉकर्स' ही वेबसाईट पायरसीसाठी कुप्रसिद्ध आहे. आजवर अनेक चित्रपट या वेबसाईटवरुन लिक करण्यात आले आहेत. 'अॅव्हेंजर्स एंडगेम'चे देखील काही दृश्य या वेबसाईटवर लिक करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ व्हायरल होऊ नये, म्हणून चित्रपटाचे दिग्दर्शक रुसो बंधू या जोडीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर चाहत्यांना आवाहन करणारे पत्र लिहिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून 'अॅव्हेंजर्स एंडगेम'ची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट एंडगेमचा शेवटचा भाग असल्याने यात काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 'थ्रोन्स'च्या विरोधात 'हल्क', 'कॅप्टन अमेरिका', 'स्पाईडरमॅन', 'थॉर', 'कॅप्टन मार्व्हल' आणि 'अँटमॅन' या सर्वांचा हल्लाबोल या एंडगेममध्ये पाहायला मिळणार आहे.
भारतात २६ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच या शोचे सर्व टिकीट बुक झाले आहेत.