मुंबई - मराठी तसेच हिंदी चित्रपटक्षेत्रात आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांना ७२ वर्षे पूर्ण झाले आहेत. नाटक, चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमातून त्यांनी आपलं एक वेगळं प्रस्थ निर्माण केलं आहे. या तीनही माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य गाजवले आहे. जाणून घेऊयात त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासाविषयी...
अशोक सराफ यांनी आजवर अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. या सर्व चित्रपटातील त्यांच्या पात्रांची वेगळीच छाप आजही प्रेक्षकांवर पाहायला मिळते. त्यांना 'पांडू हवालदार' या चित्रपटातील भूमिकेने विशेष प्रसिद्धी मिळवून दिली होती. या चित्रपटात त्यांना दादा कोंडके यांच्याबरोबर भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.
त्यानंतर अशोक सराफ आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'बिनकामाचा नवरा' या चित्रपटात दोघांनीही एकत्र भूमिका साकारली होती.
अशोक सराफ यांच्या 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाबद्दल तर काही वेगळं सांगायला नको. या चित्रपटातील त्यांनी साकारलेला 'धनंजय माने' कोण विसरेल? या चित्रपटानंतर सचिन पिळगावकर यांच्यासोबतही त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
'आयत्या घरात घरोबा', 'एक डाव भुताचा', 'आमच्यासारखे आम्हीच' यांसारख्या चित्रपटातूनही त्यांच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
छोट्या पडद्यावरील 'हम पांच' ही मालिका देखील बरीच वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहीली. या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले.