सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. मंगळवारी पहाटे ४.४५ वाजता साताऱ्याच्या प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या 79 वर्षांच्या होत्या.
फलटण तालुक्यात चित्रीकरण सुरू असलेल्या 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या सेटवरील 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी समोर आली होती. यामध्ये आशालता वाबगावकर यांचाही समावेश होता. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
आशालतांनी कोकणी आणि मराठी नाटकांमधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे त्यांचे पहिले मराठी नाटक. मराठीसह बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. जंजीर, दो आँखे बारा हाथ, सदमा, कूली अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. बसू चॅटर्जींचा अपने पराये हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. यामधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट सहअभिनेत्रीचे फिल्मफेअर नॉमिनेशनही मिळाले होते.
गुणी, चतुरस्त्र कलावंताला मुकलो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठी रंगभूमीबरोबरच चित्रपट आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळे गुणी आणि चतुरस्त्र अशा कलावंताला मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, कवयित्री, गायिका, लेखन अशा क्षेत्रांत गती असलेल्या आशालता यांनी अजरामर अशा भूमिका साकारल्या. संगीत नाटक आणि व्यावसायिक नाट्यसृष्टीत त्यांचा उत्कृष्ट कलाकार म्हणून दबदबा होता. मराठी कुटुंबातून आलेल्या आशालता या नव्या होतकरू कलाकारांनाही जवळच्या मार्गदर्शक वाटत. त्यामुळे त्यांनी या पिढीतही जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले होते. त्यांचे कला क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही, असेच आहे.
ही महामारी असं कोणाला तरी गिळून टाकेल, असे वाटले नव्हते - अलका कुबल
गेली ३५ वर्षे मी आशालता यांच्यासोबत काम करते आहे. आमच्यात आई-मुलीचे नाते होते. ही दुर्दैवी घटना त्यांच्या बाबतीत घडेल. ही महामारी असे कोणला तरी गिळून टाकेल, असे वाटले नव्हते, अशा शब्दांत अभिनेत्री व निर्माती अलका कुबल-आठल्ये यांनी येथे व्यक्त केल्या. अलका कुबल यांच्या मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात आल्या असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. अभिनेत्री अलका कुबल त्यांच्यासोबत येथेच हाॅस्पिटलमध्ये त्यांची सुश्रुषा करत होत्या. गेले चार दिवस आशालता यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते.
आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, त्यांना मधुमेह वगैरे कशाचाही त्रास नव्हता. असे काही होईल, असे वाटले सुद्धा नाही. माझ्यासाठी हा धक्का सहन होणारा नाही. त्या कालपर्यंत बोलत होत्या. नंतर कोमात गेल्यामुळे त्या व्हेंटिलेटरवर होत्या. कोरोनामुळे आवश्यकती सर्व खबरदारी आम्ही सेटवर घेत होतो. तरी कशामुळे लागण झाली, हे सांगता येत नाही. ही महामारी कोणालाही गिळून टाकू शकते. कोणतेही क्षेत्र त्यापासून लांब राहू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.
साताऱ्यातच होणार अंत्यसंस्कार..
त्यांचा मुलगा, भाचा-भाची कोरोनामुळे येऊ शकले नाहीत. त्यांच्या पार्थिवाला मुंबईपर्यंत आणण्याची तसदी घेऊ नका, असे कुटुंबीयांनी कळवल्याने मी, माझे पती समीर येथे आहोत. कोविड रुग्ण असल्याने शासकीय सोपस्कारांनुसार येथेच जे करावे लागेल ते आम्ही करत आहोत," असेही कुबल म्हणाल्या.