मुंबई - अभिनेता अपारशक्ती खुरानाने अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर आता तो गायनातही त्याच्या आवाजाची जादु पाहायला मिळते. त्याचे पहिले वहिले पंजाबी गाणे 'कुडीये नी' हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने केले आहे.
अपारशक्तीने बऱ्याच चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. मात्र, त्याच्या या गाण्यात त्याची मुख्य भूमिका पाहायला मिळतेय. या गाण्यात त्याच्यासोबत सरगुन मेहता हिने भूमिका साकारली आहे. 'कुडीये नी' गाण्यात दोघांचीही केमेस्ट्री अतिशय सुंदर असलेली पाहायला मिळतेय.
अपारशक्तीने हे गाणे 'दंगल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच लिहिले होते. हे गाणे त्यानेच कंपोजही केले आहे. अपारशक्तीसोबत नीती मोहनचा स्वरसाजही या गाण्याला चढला आहे.
ताहिराने या गाण्याबाबत बोलताना सांगितले, की 'अपारशक्ती हे गाणे घेऊन तिच्याकडे आला होता. दहा दिवसात हे गाणे शूट व्हावे, असे तो म्हणाला होता. त्यानंतर आम्हा सलग ४-५ दिवस या गाण्यावर काम केले. या गाण्यावर काम करताना खूप मजा आली'. ताहिरा कश्यपने दिग्दर्शित केलेले हे दुसरे गाणे आहे. यापूर्वी तिने 'टॉफी' या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले आहे.