मुंबई - हॉटेल्समध्ये कितीही स्वादिष्ट जेवण मिळत असले तरीही त्याला घरच्या जेवणाची सर येत नाही. फक्त घरच्या जेवणानेच मन तृप्त होते. ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखने नुकताच याचा अनुभव घेतला. फातिमाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ती घरीच विलगीकरणात आहे. जेवण बनवण्यासाठी कोणी येत नव्हते, त्यामुळे ती काळजीत होती. या कठीण प्रसंगी तिचा एक सहकलाकार तिच्या मदतीला आला आहे. अनिल कपूर यांनी सनासाठी आपल्या घरून जेवण पाठवले.
फातिमाने नुकतेच राजस्थानमध्ये अनिल कपूरसोबत अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाचे शूट संपवले आहे. अनिल कपूर राजस्थानमध्ये त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर तिचा वाढदिवस साजरा करतानाही दिसले होते. ही दोस्ती मुंबईत कामाला आली. फातिमाच्या आजारपणाबद्दल समजल्यानंतर अनिल कपूरने ताबडतोब तिच्या घरी आपल्या घरून जेवण पाठवण्याची व्यवस्था केली.

राजस्थानमध्ये शूटिंग दरम्यान सनाने सेटवरील फोटो शेअर केले होते आणि तिला अभिनयातील बारकावे शिकवण्यासाठी अनिल कपूरचे आभारही मानले होते. आताही अनिल कपूरने तिला ‘घर का खाना’ पाठवल्याबद्दल तिने त्याचे फोटो समाज माध्यमांवर शेअर करून आभार मानले आहेत. फातिमा सना शेख गेल्या वर्षी 'लुडो' आणि 'सूरज पे मंगल भारी'मध्ये दिसली होती. त्यात तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते. येत्या काळात फातिमा सना शेख अरुवी, अजिब दास्तान आणि एका नाव न ठरलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांना सामोर येणार आहे.
हेही वाचा - अभिजीत श्वेतचंद्र व शीतल अहिरराव झाले 'लंडनचा राजा... इटलीची राणी’!