मुंबई - जेएनयू हिंसाचाराचे पडसाद कलाविश्वातही उमटताना दिसत आहेत. आत्तापर्यंत बऱ्याच कलाकारांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विंकल खन्ना, राजकुमार राव, अनुराग कश्यप, सोनम कपूर या कलाकारांसोबतच इतरही कलाकारांनी आपले मत मांडले आहे. अलिकडेच अनिल कपूर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
अनिल कपूर यांच्या आगामी 'मलंग' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा अलिकडेच पार पडला. यावेळी त्यांनी चित्रपटासोबतच इतरही बऱ्याच विषयावर संवाद साधला. त्यांना जेएनयू येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले, की 'ही घटना अतिशय विचलित करणारी आहे. धक्कादायक आहे. मला या घटनेचा मोठा धक्का बसला होता. ही घटना वाचून मी रात्रभर झोपू शकलो नाही'.
हेही वाचा -जेएनयू हिंसाचार : देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा, ट्विंकल खन्नाची तीव्र प्रतिक्रिया
'या घटनेचा निषेध व्हायलाच पाहिजे. मी जे पाहिले ते खरंच दु:खदायक आहे. त्रासदायक आहे. हिंसेमुळे काहीच मिळवता येऊ शकत नाही. ज्यांनी हे केलं आहे, त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे', असे अनिल कपूर यावेळी म्हणाले.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अनिल कपूर हे 'मलंग' चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, दिशा पटाणी, कुणाल खेमू यांची देखील मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. मोहित सुरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -जेएनयू हिंसाचार : स्वरा भास्कर, तापसी पन्नुसह बॉलिवूडकरांचा संताप