गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये इरफान खान एका असाध्य रोगाचा शिकार झाला व अवेळी हे जग सोडून गेला. तो आपल्या अद्वितीय अदाकारीने जागतिक मनोरंजनसृष्टीत आपली छाप सोडणारा कलाकार होता. लॉकडाऊन आधी त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘अंग्रेजी मिडीयम’ प्रदर्शित झाला होता व बाप-लेकीच्या हळव्या प्रेमावर आधारित ही गोष्ट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडली होती. नुकत्याच पार पडलेल्या ६६ व्या फिल्मफेयर अवॉर्ड्स मध्ये इरफानला ‘अंग्रेजी मिडीयम’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याचा मुलगा बबिलने हा पुरस्कार स्वीकारला खरा पण त्याला अगदी गहिवरून आले. अतिशय भावुक होत तो चार शब्द बोलला. ‘अंग्रेजी मिडीयम’ हा चित्रपट मॅडॉक फिल्म्स ची निर्मिती होती आणि त्यांनीही भावनिक होत इरफानला श्रद्धांजली वाहिली.
‘तू नेहमीच अनेक मैलाचे दगड पार करीत राहिलास. तुझ्या अद्वितीय अभिनयकौशल्याने तू संपूर्ण विश्वात कीर्ती मिळवलीस याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटत राहील. आम्ही आमचे भाग्य समजतो की या वाटचालीत काही पावलं आम्हीही तुझ्यासोबत चाललो. कठीण परिस्थितीतही हसतमुख कसं राहायचं हे तू आम्हाला शिकवलंस. आयुष्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि या सर्वांचा आनंद घेतल्याबद्दल धन्यवाद. तुझा विजय साजरा करण्यात आम्ही धन्यता मानतो. ‘हिंदी मिडीयम’ आणि ‘अंग्रेजी मिडीयम’ साठी धन्यवाद आणि त्यादरम्यानच्या प्रत्येक गोष्टींसाठीही आम्ही नतमस्तक आहोत’ मॅडॉक फिल्म्सने समाज माध्यमावर हे पोस्ट केले.
‘अंग्रेजी मिडीयम’ जियो स्टुडियोज आणि प्रेम विजन यांचे प्रस्तुतीकरण होते. होमी अडाजानीया दिग्दर्शित या चित्रपटात राधिका मदन, दीपक डोबरियाल आणि करीना कपूर खान यांनी अभिनय केला होता. २०१८ साली फिल्मफेयरने इरफान खान अभिनित ‘हिंदी मिडीयम’ ला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारांनी गौरविले होते. यावर्षीच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात दिवंगत अभिनेता इरफान खान ला जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले. पुरस्काराच्या रात्री ट्रॉफी स्वीकारताना इरफानचा मुलगा बबील भावूक झाला होता.
हेही वाचा - हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजविणाऱ्या अच्युत पोतदार यांना झी मराठीने प्रदान केला जीवनगौरव पुरस्कार!