मुंबई - लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानला जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सध्या सुरू आहे. जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी मतदान करावे, यासाठी प्रत्येक स्तरातुन प्रयत्न केले जात आहेत. कलाविश्वातुनही अनेक कलाकार पुढे येऊन चाहत्यांना मतदानाचे महत्व पटवून सांगत आहेत. आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खानदेखील पुढे सरसावला आहे. त्यानेही मतदानाचे महत्व पटवून सांगण्यासाठी एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
'आपल्याला मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी आपल्या पुर्वजांनी अनेक बलिदान दिले आहेत. त्यांची आठवण म्हणून तरी आपण आवर्जुन मतदान करावे', असे आमिरने या व्हिडिओद्वारे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने आमिरचा हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
अलिकडेच शाहरुख खानने एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना मतदानाचे आवाहन केले होते. 'लेट्स वोट' या गाण्याद्वारे त्याने स्वत: गाणे गाऊन चाहत्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे.