मुंबई - डिजीटल व्यासपीठांचा वाढता प्रभाव पाहून आत्तापर्यंत बऱ्याच बॉलिवूडकरांनी डिजिटल विश्वात एन्ट्री घेतली आहे. आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देखील लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांना आपल्या सीरिजमध्ये घेण्यासाठी अॅमॅझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्समध्ये चढाओढ लागली आहे.
अलिकडेच खुद्द अमिताभ बच्चन यांनी डिजिटल विश्वात पदार्पण करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. 'एखाद्या चांगल्या वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच करेन', असे ते म्हणाले होते.
त्यांनंतर अॅमॅझॉन प्राईमचे विजय सुब्रमण्यम आणि अपर्णा पुरोहित यांनी लगेचच अमिताभ बच्चन यांनी आपल्या वेबसीरिजमध्ये भूमिका साकारावी, असे म्हटले आहे.
अभिषेक बच्चनने यापूर्वी अॅमॅझॉन प्राईमसोबत काम केले आहे. त्यामुळे आता अमिताभ यांच्यासोबतदेखील आम्हाला काम करण्याची संधी मिळावी, असेही ते म्हणाले.
अॅमॅझॉन प्राईमची लवकरच एक तरुणाईवर आधारित रिअॅलिटी शोची निर्मिती करणार आहे. 'स्कल्स अँड रोझेस', असे या शोचे नाव आहे. ३० ऑगस्टला या शोचा प्रिमिअर होईल.