मुंबई - मुंबईतील फिल्म इंडस्ट्री फेडरेशनचे सदस्य असलेल्या ३० हजार कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी नामवंत निर्माता आदित्य चोप्राने पुढाकार घेतला आहे.
एका आघाडीच्या वेबसाईटनुसार आदित्य चोप्रा यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना आपल्या कंपनीला ६०हजार कोविड-१९ लस खरेदी करण्याची आणि या कामगारांच्या लसीकरण कार्यक्रमाशी संबंधित सर्व खर्च करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
यशराज फिल्म्स या आदित्य चोप्राच्या बॅनरने हिंदी चित्रपटसृष्टीतील दैनंदिन वेतन कामगारांना लसीकरण मोहिमेसंदर्भात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसी) या संघटनेला पत्र लिहिले आहे.
या पत्रात असे लिहिले आहे की, "चित्रपट उद्योग अभूतपूर्व काळामधून जात असताना लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याची तातडीने गरज आहे. जेणेकरुन हजारो कामगार पुन्हा आपला उदर निर्वाह करू शकतील आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतील. यश चोप्रा फाऊंडेशनच्या माध्यमातून यशराज फिल्म्स यासंदर्भात पाठिंबा दर्शवू इच्छितो. आम्ही महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे की मुंबईतील फिल्म इंडस्ट्री फेडरेशनचे सदस्य असलेल्या ३० हजार नोंदणीकृत कामगारांना कॉव्हीड -१९ लस वाटप करण्यास लवकरात लवकर परवानगी द्यावी.
त्यांनी पत्रात पुढे लिहिलंय की, ''यश चोपडा फाउंडेशन कामगारांना लसीकरण करण्याशी संबंधित इतर सर्व खर्चाची भरपाई करेल जसे की जनजागृती करणे, कामगारांची वाहतूक करणे आणि लसीकरण कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा स्थापित करणे. आम्हाला आशा आहे की आमची विनंती मंजूर होईल आणि आमचे सर्व सदस्य सुरक्षित राहून सक्षमपणे पुन्हा कामावर परततील.''
हेही वाचा - कुणाल कामराने व्हिडिओ पोस्ट करुन उडवली 'कंगना'ची खिल्ली