मुंबई - 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'पती पत्नी और वो' अशा अनेक सुपरहीट सिनेमात काम केलेली अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे आज मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 72 वर्षाच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाले होते. गेल्या तीन महिन्यापासून त्यांचा आजार बळावल्याने त्यांना मुंबईतील वर्सोवा येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. आज दुपारी 12 वाजता क्रिटिकेअर रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
चित्रपटसृष्टीतील प्रवास -
आपल्या बॉलिवूडमधील यशस्वी करिअरनंतर त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर कमबॅक केला होता. 'काव्यांजली', 'जारा', 'बहू रानी', 'भाभी' अशा काही मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. काही दिवसांपूर्वी कलर्स वाहिनीवर आलेल्या 'कुल्फी' या मालिकेत त्यांनी अखेरचं काम केलं.
विद्या यांनी 2001 साली नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी लग्न केलं. मात्र नवऱ्याकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून त्यांनी त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी मिळून एका मुलाला दत्तक घेतलं होतं. 2011 साली आलेल्या सलमान खान स्टारर 'बॉडीगार्ड' या सिनेमात सुध्दा विद्या यांनी भूमिका साकारली होती. त्यांच्या जाण्याने एक साधी आणि सोज्वळ व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याची भावना बॉलिवूडमधून व्यक्त होत आहे.