मुंबई - प्रथमेश परब अभिनित ‘टकाटक’ ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. “खरंतर ‘टकाटक’ ही ॲडल्ट कॉमेडी होती व आम्ही सर्वच थोडे साशंक होतो की या चित्रपटाला प्रेक्षक-पाठिंबा मिळेल की नाही म्हणून. मनोरंजनसृष्टीतल्या अनेकांनी मला हा सिनेमा करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांचा विचार माझ्या भल्याचाच होता पण अशाप्रकारच्या विषयाला मराठी प्रेक्षक थारा देत नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. मी आणि आमच्या टीमचा टार्गेट ऑडियन्स होता तरुण प्रेक्षकवर्ग. त्यांचा तर पाठिंबा मिळालाच परंतु अगदी साठीपलीकडील प्रेक्षकांनाही हा चित्रपट मनोरंजित करून गेला. खरंच खूप छान वाटलं की आपण घेतलेली रिस्क फळली म्हणून. मराठी चित्रपट ‘कन्टेन्ट’ साठी ओळखला जातो आणि ‘टकाटक’ मध्ये ’कन्टेन्ट’ नसता तर प्रेक्षकांनी तो धुडकावून लावला असता. माझ्या मते मराठी प्रेक्षक मोठ्या मनाचा झालाय हे खरं”, प्रथमेश परब सांगत होता ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी गप्पा मारताना. ‘टकाटक’ ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्याचा सिक्वेल अपेक्षितच आहे परंतु त्यापलीकडे काहीही सांगण्यास प्रथमेशने हसत हसत नकार दिला.
‘ओह माय घोस्ट’ कडून खूप अपेक्षा
प्रथमेश परबची मुख्य भूमिका असलेला एक हॉरर-कॉमेडी चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ‘ओएमजी’ म्हणजे ‘ओह माय गॉड’ नव्हे तर ‘ओह माय घोस्ट’. “जेव्हा मला हा चित्रपट ऑफर झाला तेव्हा मलासुद्धा वाटले होते की ओएमजी’ म्हणजे ‘ओह माय गॉड’ असणार. कदाचित हा सिक्वेल वगैरे असेल असे वाटले परंतु ‘ओएमजी’ म्हणजे ‘ओह माय घोस्ट’ आहे असे कळल्यावर माझा त्यातील इंटरेस्ट अधिकच वाढला. ही एका जग्गू नामक अनाथ युवकाची कथा आहे. जीवनात आपण काहीच मिळवू शकलो नाही, अशा हताश मनःस्थितीत असताना त्याला स्वप्नात भूते दिसू लागतात. जग्गूला स्वतःचे आयुष्य आधीच ओझे वाटत असताना आता त्याला या भूताखेतांच्या विश्वाला सामोरे जावे लागते. या भूतांच्या माऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या करतो आणि हे करत असताना त्याला जीवनातील इतर अंगांचा साक्षात्कार होतो. त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि नवीन पहाट त्यांच्या जीवनात येते. अशी ही गोड कहाणी आहे या चित्रपटाची”, प्रथमेशने विस्ताराने सांगितले. “खरंतर ‘हॉरर’ जॉनर चे चित्रपट मराठीत फारसे बनत नाहीत म्हणून मला याची कथा आवडली होती. आता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय व लॉकडाऊन नंतर रिलीज होतोय त्यामुळे मला ‘ओह माय घोस्ट’ कडून खूप अपेक्षा आहेत”, प्रथमेश पुढे म्हणाला.
नोकरी करणार होता प्रथमेशप्रथमेशचा लॉकडाऊन अगदीच बोअरिंग होता हे त्याने प्रांजळपणे सांगितले. “थोडाफार अभिनयाचा अभ्यास सुरु होता पण एकट्याने पॅचेस करणे कंटाळवाणं होतं. सेटवर गाईड करायला चार-पाच माणसं असतात त्यामुळे चुका कळतात. ओटीटी वर अनेक चित्रपट बघितले व मित्रांसोबत त्यावर चर्चाही केली”, तो बोलला. अभिनयाबद्दल फारसा गंभीर नसलेला प्रथमेश ‘बँकिंग अँड इन्शुरन्स’मध्ये डिग्री घेऊन रीतसर नोकरी करणार होता. परंतु म्हणतात ना नियती पुढे कोणाचेही चालत नाही. “२०१३ मध्ये १३वी मध्ये असताना ‘बालक पालक’ नावाची एकांकिका केली होती व २०१४ ला त्याच्यावर सिनेमा बनला आणि रवी जाधव यांनीं मला त्यामध्ये छोटा रोल दिला. ग्रॅड्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना, २०१५ मध्ये रवी सरांनी मला ‘टाइम पास’ साठी निवडलं. तो माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. मी डिग्री मिळविली खरी पण त्याचा मला आता काहीच उपयोग दिसत नाहीये. ‘टाइम पास’ नंतर मी याच क्षेत्रात रमलो आणि ‘देयर आर नो रिग्रेट्स’” असे प्रथमेश ने ठासून सांगितले.
रवीसर पितासदृश आपण रुढीबध्द, प्रचलित ‘हिरो’च्या व्याख्येत बसत नाही याची त्याला पूर्ण जाणीव आहे व तसे नसण्याचा त्याला कसा उपयोग होऊ शकेल यावर त्याने मार्गही काढलाय. “माझी मराठी धड नव्हती, माझी हाईट कमी, मी रंगाने काळा आहे, याची कल्पना होती. परंतु याच्यातून बाहेर पडून आपण लोकांना आवडू शकतो हेच मला आवडायला लागलं आणि मी इथेच करियर करण्याचं पक्के केले. मला वाटलं होतं की ‘बालक पालक’ नंतर मला चरित्र भूमिका मिळतील पण मी रवी सरांचा आजन्म ऋणी राहीन की त्यांनी मला ‘टाइम पास’ मधून थेट ‘हिरो’ कॅटेगरीत बसवलं”, प्रथमेश मनापासून सांगत होता. प्रथमेश अजूनही रवी जाधव यांच्या संपर्कात असतो. ‘माझ्या इतर चित्रपटांतील भूमिकांमध्ये चांगल्या-वाईट गोष्टींचा ते उहापोह करीत असतात. महत्वाचे म्हणजे ते माझा फोन लगेच उचलतात. ते मला पितासदृश आहेत. इंडस्ट्रीत माझा कोणी बाप असेल तर ते रवी सर आहेत. मी त्यांना फालतूतले फालतू प्रश्न विचारतो व ते त्यांचं शांतपणे निरसन करतात ‘तुला अजूनही असले प्रश्न पडतात?’ हे विचारत.”
‘ओह माय घोस्ट’ची प्रतीक्षाप्रथमेश परबला भावनिक रोल करायला आवडत असले तरी तो विनोदी भूमिकांमध्ये जास्त रमतो. त्याच्यामते कॉमेडी आजूबाजूची ‘निगेटिव्हिटी’ धुवून काढते. मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये तो ‘सिनेमा’ ला प्राधान्य देतो कारण त्याच्यादृष्टीने चित्रपटांतून कलाकारांकडून सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टी काढून घेतल्या जाऊ शकतात. ‘टाइम पास’ नंतर प्रथमेश परब त्याच्या सिक्वेलमध्ये पण दिसला. तसेच ‘लालबागची राणी’, ‘३५% काठावर पास’, ‘खिचीक’, ‘टकाटक’ या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचे आगामी चित्रपट ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘टकाटक’ चे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा पुढील चित्रपट, हे असून, रोहनदीप सिंगच्या ‘जम्पिंग टोमॅटोज’ प्रस्तुत व वासिम खान दिग्दर्शित ‘ओह माय घोस्ट’ लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. हेही वाचा -
मास्टर'मधून हटवलेला सीन : सीन खराब केल्याबद्दल नेटीझन्सने गौरी किशनला धरले जबाबदार