मुंबई - अभिनेता प्राचीन चौहान याला जामिन मंजूर झाला आहे. एका अभिनेत्रीच्या विनयभंगाच्या आरोपाखाली त्याला मुंबईतील मालाड पूर्व कुरार पोलिसांनी अटक केली होती.
दाक्षिणात्य अभिनेत्रीवर डान्ससाठी प्राचीनची जबरदस्ती
डेली सोप क्वीन एकता कपूर हिच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण करणारा अभिनेता प्राचीन चौहान याला विनयभंगाच्या गंभीर आरोपाखाली मुंबईच्या मालाड पूर्व कुरार पोलिसांनी अटक केली होती. १ जुलैच्या रात्री मालाड पूर्व येथील ओमकार बिल्डिंग येथे प्राचीन चौहान याने आपल्या घरी पार्टी ठेवली होती. या पार्टीला त्याने एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला देखील बोलावले होते. ही दाक्षिणात्य अभिनेत्री आपल्या एका गायक मित्रासोबत प्राचीन चौहान याच्या घरी पार्टीला पोहोचली. पार्टी रंगात आल्यावर दारुच्या नशेत असलेल्या अभिनेता प्राचीन चौहानने दाक्षिणात्य अभिनेत्रीला सुरुवातीला पार्टीत डान्स करायला बोलावले.
प्राचीनची अभिनेत्रीला थोबाडीत
अभिनेत्रीने त्याच्यासोबत डान्स करायला नकार दिला. तरी देखील प्राचीन चौहान सतत तिला डान्स करायला बोलवत होता आणि ती विरोध करत होती. बराच वेळ चाललेल्या या तमाशात शेवटी प्राचीन चौहानने त्या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या थोबाडीत लगावली. या घटनेनंतर अभिनेत्री आणि तिच्या गायक मित्राने जवळचे कुरार पोलीस ठाणे गाठले आणि प्राचीन चौहान विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
प्राचीनला अटक
कुरार पोलिसांनी दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या जबाबावरुन कलम ३५४,३४२,३२३ आणि ५०६ (२) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राचीन चौहानला कुरार पोलिसांनी अटक करुन बोरीवली न्यायालयात हजर केले. बोरीवली न्यायालयाने प्राचीन चौहान याला कोठडी सुनावली. यानंतर बोरिवली न्यायालयाने त्याला जामिनही मंजूर केला आहे. याची माहिती प्राचीनचे वकिल विकाश सिंह गोरा यांनी दिली आहे.
अनेक मालिकांमध्ये प्राचीन मुख्य भूमिकेत
अभिनेता प्राचीन चौहान सध्या यूट्यूबवर 'शिट्टी आयडियाज ट्रेंडिंग' या वेब सीरिजमध्ये छवी मित्तल आणि पूजा गौर यांच्यासोबत काम करत आहे. तो साकारत असलेला अभिमन्यू लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेनंतर प्राचीनने सोनी टीव्हीवर एकता कपूरच्याच 'कुछ झुकी सी पलकें' या आणखी एका मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय प्राचीनने 'सिंदूर तेरे नाम का', 'साथ फेरे' आणि 'माता पिता के चरणो में स्वर्ग' यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते.
हेही वाचा - 'कयामत से कयामत तक' म्हणणाऱ्या फिल्मी हिरोचा पहिला विवाह टिकला 16, तर दुसरा 15 वर्षे