मुंबई - 'बिग बॉस मराठी' फेम अभिजित बिचुकले यांनी मुंबईतील वरळीतून शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत. फक्त याबाबतची घोषणा करून न थांबता त्यांनी चक्क शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखलही केला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संपुर्ण राज्याच लक्ष लागले आहे ते वरळी विधानसभा मतदारसंघाकडे. कारण, आदित्य ठाकरेंच्या रुपात ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहे. त्यामुळे अनेकांनी राजकीय धर्म पाळून त्यांच्या विरोधात सौम्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर, मनसे नेते राज ठाकरे यांनीही काकाचं नात जपत वरळीतून मनसेचा उमेदवार रिंगणात उतरवला नाही. अशात ही निवडणूक एकतर्फी होते की काय असं वाटत असतानाच बिचुकले यांनी या निवडणुकीत नवे रंग भरले आहेत.
बिचुकले हे निवडणुकीच्या मैदानातल तसं नवीन नाव मुळीच नाही. यावर्षी विधानसभा निवडणुका जाहीर होताच त्यांनी २८८ मतदारसंघातून आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण कामाच्या व्यापात व्यस्त असल्याने सगळीकडे दौरे करणं शक्य नसल्याने नंतर त्यांनी हा बेत रद्द केला. त्यानंतर ते सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशीही चर्चा रंगली.
मागे एकदा अशी लढत देऊन त्याचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यामुळे यावेळी त्यांनी तो बेत सुद्धा रद्द केला. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला थेट राष्ट्रपती करावं, अशी विनंती करणार पत्र सुध्दा पाठवलं होत. चर्चेत राहण्याचे सारे मार्ग संपले असं वाटत असतानाच 'बिग बॉस मराठी'चं अवताण त्याना आलं आणि रातोरात बिचुकले लोकांसाठी चर्चेचा विषय ठरले.
अनेकांना त्यांचा राग आला, तर काही जणांना ते साधे आणि सच्चे वाटले. त्यामुळेच तर. घरातून बाहेर जाऊनही वहिनीने त्याना पुन्हा शोमध्ये आणून अखेरपर्यंत त्याना शो मध्ये कायम ठेवलं.
आता ऐन निवडणुकीच्या हंगामात असं स्वयंघोषित नेतृत्व स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. त्यामुळे त्यांनी थेट मुंबईत येऊन आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय.
हेही वाचा -विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरेंची संपत्ती माहीत आहे का?
बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या स्वप्नात काल आई भवानी अली आणि तिने आपल्याला ही सूचना केली. त्यामुळे आपण सातारा सोडून मुंबईतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं सांगितलं आहे.
बिचुकले यांच्या मैदानात येण्याने आदित्य ठाकरेंना अजिबात फरक पडणार नसला, तरीही साताऱ्यापेक्षा मुंबईत असे स्टंट केले तर जास्त प्रसिद्धी मिळते हे बिचुकले यांच्या ध्यान्यात आलं आहे. त्यामुळे संपुर्ण राज्याच लक्ष लागलेल्या निवडणुकीत लोकांचं लक्ष वेधून घेण्याची ही नामी संधी बिचुकले यांनी साधली आहे.
हेही वाचा - यासाठीच मला नवा महाराष्ट्र घडवायचा - आदित्य ठाकरे