मुंबई - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खान आणि 'नवाब' सैफ अली खान दोघेही पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. 'दिल चाहता है' या चित्रपटात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. आता पुन्हा एकदा एका हिंदी रिमेकमध्ये ते सोबत भूमिका साकारताना दिसणार आहेत.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सुपरहिट ठरलेल्या 'विक्रम वेदा' या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच तयार करण्यात येणार आहे. राजा विक्रमादित्या आणि वेताळ यांच्या कथेवरुन या चित्रपटाचे शिर्षक तयार करण्यात आले आहे.
या चित्रपटात विक्रम हे एक पोलिसाचे पात्र आहे. तर वेदा हे एका गुन्हेगाराचे पात्र आहे. विक्रम वेताळ प्रमाणेच पोलिस आणि एका गुन्हेगाराची कथा या चित्रपटात सांगण्यात आली होती. आता याच चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार करण्यात येणार आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदी रिमेकमध्ये आमिर खान हा गुन्हेगाराच्या भूमिकेत तर सैफ हा पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे.
मुळ चित्रपटात आर. माधवनने ही भूमिका साकारली होती. तर, विजय सेथीपतीने 'वेदा'चे पात्र साकारले होते.
पुष्कर - गायत्री हे या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनीच तमिळ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.
सध्या या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरू आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल.