मुंबई - कोरोना या असाध्य रोगाला हरवण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत चालले आहेत, तसे लोकांचा धीर सुटत चालला आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम डावलून लोकं रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. म्हणूनच त्याना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला दिग्दर्शक विजू माने यांची टीम आणि मराठी सिनेसृष्टीतील 21 कलाकार एकत्र आले आहेत. या सगळ्यांनी मिळून घे जबाबदारी तू रहा ना घरी हे गाणं सोशल मीडियावर लाँच केलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सामाजिक काम म्हटलं की जी लोकं पुढे येतात त्यातलंच एक नाव म्हणजे दिग्दर्शक विजू माने, सांगली आणि कोल्हापूरमधील महापुराच्या वेळी त्यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर मदत जमा करून पाठवली होती. तर यावेळी सरकारच्या नियमांच पालन करायचं असल्याने घरीच राहून त्यांनी आणि त्यांच्या क्रिएटिव्ह टीमने हे नवीन गाणं तयार केलं आहे.
जगभरातील 21 देश हे सध्या कोरोनामुळे त्रस्त आहेत. त्यामुळेच 21 मराठी कलाकार आणि या 21 देशात राहणारे नागरिक यांना घरूनच व्हिडीओ काढून या गाण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे.
कलाकारांमध्ये प्रसाद ओक, दिग्दर्शक रवी जाधव, जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी, संतोष जुवेकर, उदय सबनीस, सुबोध भावे आशा 21 कलाकारांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय मराठी माध्यमातील काही आघाडीच्या चेहऱ्याचा देखील या गाण्यात समावेश करण्यात आलेला आहे. हे गाणं आज सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून त्याद्वारे लोकांना घरातच राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे. गेले 25 दिवस आपण घरात राहिल्यामुळेच आरोग्य सेवकांना आणि पोलिसांना या रोगाची लागण झालेल्यांना आटोक्यात ठेवण्यात यश आलं आहे. त्यामुळे हे गाणं पाहून तरी उगीचच बाहेर पडून यंत्रणावरील ताण वाढवण्याऐवजी घरात बसून कोरोना विरुद्धच्या लढ्यात त्याना नक्की साथ देतील हीच अपेक्षा..