दिल्ली - भारताच्या वतीने 'गली बॉय' या चित्रपटाची निवड ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी करण्यात आली आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची ऑस्करला पाठवण्याची घोषणा इंडियन फिल्म फेडरेशनने शनिवारी केली. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या प्रतिष्ठित अकॅडमी अवॉर्ड्ससाठी बेस्ट फिचर फिल्म विभात गली बॉयचे नामांकन होईल. झोया अख्तर हिने दिग्दर्शित केलेल्या या ‘गली बॉय’ चित्रपटाला मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सव 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.
यावेळी ऑस्कर पुरस्काराठी २७ चित्रपट शर्यतीत होते. मात्र सर्वानुमते गली बॉयची निवड करण्यात आल्याचे एफएफआईचे सचिव सुपर्ण सेन यांनी सांगितले.
काय आहे कथानक -
'मुराद' म्हणजेच रणवीर सिंग हा धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा एक मुस्लिम मुलगा आहे. घरी ड्रायव्हरची नोकरी करणारे वडील (विजय राज) आणि आई (अमृता सुभाष), आजी (ज्योती सुभाष), आणि सोबत प्रचंड गरिबी आहे. वडील मोठ्या हिमतीने मुलाला शिकवण्यासाठी मेहनत करतात. मात्र, शिकुन मोठं झाल्यावर मुलाने त्यांचे पैसे आणून घर चालवावे, अशीही त्यांची इच्छा आहे. अशात वडील दुसरं लग्न करून वयाने लहान असलेली एक सावत्र आई आणून ठेवतात आणि कुटुंबाचा भार अधिकच वाढवून ठेवतात.
कुटुंबाची परिस्थिती एवढी हलकीची असताना मुरादला रॅपर बनण्याची तीव्र इच्छा आहे. ही गोष्ट फक्त त्याचे मोहल्ल्यातले मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड 'सखीना' म्हणजेच आलिया भटला माहिती आहे. वडीलाच्या धाकापायी आधी लपून छपून आवड जोपासणाऱ्या मुरादच्या आयुष्याला तेव्हा कलाटणी मिळते जेव्हा त्याच्या कॉलेजमध्ये तो डिजे शेर म्हणजेच 'श्रीकांत'ला भेटतो. तिथूनच मुंबईतील रॅपर्सचं एक वेगळंच विश्व त्याच्यासमोर उलगडत जातं.
एकीकडे रॅपर होण्याचा ध्यास, दुसरीकडे जगण्यासाठी शिक्षण आणि मग नोकरी करण्याचा वडिलांचा दबाव अशात मुराद त्याच रॅपर बनण्याचं स्वप्न कशाप्रकारे पूर्ण करतो आणि धारावीत राहणाऱ्या गरीब घरच्या मुरादचा 'गलीबॉय' नक्की कसा बनतो, त्याचा हाच प्रवास म्हणजेच हा सिनेमा आहे.
वरवर असे रॅपर आपण अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये पाहत असतो त्याच्या स्पर्धाही होत असतात. मात्र, कधीही चित्रविचित्र कपडे आणि दाढी मिश्या ठेवणाऱ्या या लोकांच्या जगण्याची वेदना संघर्ष आपण कधीच जाणून घेत नाही. मुळात ही कला आहे हेच मुरादच्या बापाप्रमाणे अनेकांना माहीत नाही. त्यामुळे या रॅपर्सकडे कायम समाजही लांबूनच पाहणं पसंत करतो. पण याच रॅपर्सचं आयुष्य पडद्यावर मांडण्याचा विचार दिग्दर्शक झोया आख्तर यांनी केलाय. त्यांच्यासोबत रिमा कागती यांनीही पटकथेवर तपशीलवार काम केलेलं आहे.
बॉलिवूडमधील अनेक सिनेमात धारावीचा वापर गरिबी दाखवण्यासाठी झालाय. मग तो 'सलाम बॉम्बे' असो 'धारावी' असो वा 'स्लमडॉग मिलेनियर' असो. मात्र, या सिनेमात ही झोपडपट्टी फक्त भेसूर न दिसता सिनेमातील एक पात्र वाटते. आता रॅपर्सचा आयुष्यावरचा सिनेमा म्हणजे त्याला संगीत ही तस हटके हवं त्याबाबतीत 'शंकर- एहेसन- लॉय' यांनी कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. दुसरीकडे बोस्को आणि सीझर या जोडीने सिनेमाची कोरिओग्राफी तेवढीच सुंदर केली आहे.
सिनेमॅटोग्राफर जय ओझा यांच विशेष कौतुक करायला हवं. ज्या सफाईदारपणे त्याने रॅपर्सचं जग आणि धारावीतलं जग आपल्या कॅमेऱ्याने टिपलंय, त्याने प्रेक्षक त्या जगाच्या जास्त जवळ जाऊन पोहोचतो.
सिनेमा ज्याच्या खांद्यावर अवलंबून होता तो होता रणवीर सिंग. अतिशय शांत, सहनशील, संयमी, परिस्थितीची पूर्ण जाण असलेला मुरादची व्यक्तीरेखा रणवीरने पडद्यावर मोठ्या ताकतीने साकारली आहे. आलिया भटने साकारलेल्या 'सखीना'ने त्याला मस्त साथ दिलीये.
'डीजे शेर'च्या भूमिकेत दिसलेला नवोदित अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यानेही उत्तम भूमिका साकारली आहे. सिनेमाभर त्याने रणवीरला दिलेली साथ निव्वळ लाजवाब. सिनेमा संपला तरीही त्याची भूमिका आपल्या लक्षात राहिल एवढं नक्की.
अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष यांनीही आपल्या भूमिकेत मोठ्या ताकतीने रंग भरलेत. अमृताने साकारलेली आई ही तिच्यातील दमदार अभिनेत्रीची झलक दाखवून देते. थोडक्यात काय तर 'अपना टाइम अयेगा..' म्हणणाऱ्या रणवीरचा चांगला टाइम आणणाऱ्या सिनेमामध्ये 'गली बॉय'चा निश्चितच समावेश होईल. आलियाच्या नावावर एक बबली भूमिका साकारल्याची नोंद होईल आणि सर्वच कलाकारांना आपली कलाकृती ऑस्करमध्ये दिसणार असल्याचे परमोच्च समाधान मिळेल.