मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणला आपण भावनिकदृष्ट्या ठाम व्यक्तीमत्व म्हणून ओळखतो. मात्र 'छपाक'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी मीडियासमोर तिला आपल्या डोळ्यातील अश्रू रोखता आले नाहीत.
'छपाक' ट्रेलर लॉन्च होत असताना मंचावर दिग्दर्शिक मेघना गुलजार, सहकलाकार विक्रांत मस्सीसह दीपिका हजर होती. सोमवारी मुंबईत हा सोहळा पार पडला.
चित्रपटाबद्दल बोलताना अश्रूमय डोळ्यांनी दीपिका म्हणाली, ''भावनिकदृष्ट्या, तिने हे सर्व कसे सहन केले असेल, याचा विचार करताना हा एक अतुल्य प्रवास होता. माझ्या जीवनातील हा खास चित्रपट आहे.''
पुढे म्हणाली, ''साधारणपणे तुम्ही एकत्र बसून संपूर्ण प्रक्रियेचा विचार करता आणि त्यानंतर सिनेमा करायचा की नाही याचा विचार होतो. दिग्दर्शकासोबत भेटल्यानंतर कथा ऐकताना काही मिनिटातच ठरवता, असे फारसे घडत नाही. आम्ही हा चित्रपट खूप प्रेमाने, झपाटलेपणाने, समर्पित होऊन आणि जबाबदारीने बनवला आहे.''
लक्ष्मी अग्रवाल यांच्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला विक्रांत लक्ष्मीचा खरा जीवनसाथी बनतो. तिच्या पाठीशी ठाम राहून तिला न्याय मिळण्यासाठी लढतो. 'छपाक' हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.