मुंबई - बॅडमिंटनपटू सायना नेहवालची बायोपिक 'सायना' हा चित्रपट दिग्दर्शक अमोल गुप्तेंचा महत्त्वकांक्षी चित्रपट होता. अनेक वेळा हा सिनेमा रद्द होतो की, काय अशी स्थिती असताना अखेर हा चित्रपट तयार झाल्याचा गुप्ते यांना आनंद आहे. अभिनेत्री श्रध्दा कपूरने हा सिनेमा सोडल्यानंतर अमोल गुप्तेंच्या मनात शंका तयार झाली होती.
या चित्रपटाची पहिल्यांदा २०१७ मध्ये घोषणा करण्यात आली होती. यात सायनाची भूमिका श्रध्दा कपूर साकारणार हे ठरले होते. यासाठी तिची जोरदार तयारीही सुरु झाली होती. मात्र श्रध्दाने सिनेमा सोडल्याने सायना बायोपिकचा मार्गच बंद झाला होता. त्यानंतर परिणीती चोप्राची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.
'सायना'च्या ट्रेलर लॉन्चच्या प्रसंगी परिणीती चोप्रा हजर होती. यावेळी अमोल गुप्ते यांना श्रध्दा कपूरने सिनेमा का सोडला याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. अलिकडे मला कोविडची लागण झाली होती त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही असे सांगून गुप्ते यांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
हरियाणामधील मध्यमवर्गीय कुटुंबातील सायना नेहवाल ही मुलगी जेव्हा जगातील पहिल्या स्थानावरची बॅडमिंटनपटू बनते ही 'सायना'ची कहाणी प्रेरणादायी असल्याचे अमोल गुप्ते म्हणाले.
'सायना' २६ मार्च रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात मेघना मलिक आणि मानव कौल मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा - शार्लिन चोप्राला अश्लील व्हिडिओ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर