मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे एक्स बॉयफ्रेंड असलेल्या विवेक ओबेरॉय आणि सलमान खानमध्ये याच प्रकरणावरून वाद आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही एकमेकांसमोर येणं देखील टाळताना दिसतात. अशात विवेकने नकळत सलमानच्या 'भारत' चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या बहुमतानंतर गुरूवारी मोदींचा शपथविधी पार पडला. याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. विवेकनेही या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाल्याबद्दल मोदींसोबतचा आपला एक फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये विवेकने गुजरातच्या मुख्यमंत्री पदापासून भारतच्या पंतप्रधान पदापर्यंत तिसऱ्यांदा मोदींना शपथ घेताना पाहात असल्याचे म्हटले आहे.
या ट्विटमध्ये त्याने 'भारत' शब्दाआधी हॅश्टॅग वापरल्याने त्यासमोर सलमानची इमोजी आली आहे. विवेकची ही चूक नेटकऱ्यांच्या नजरेतून चुकली नाही. विवेकच्या हे लक्षात येताच त्याने आपल्या ट्विटमधून भारत शब्दासमोरचा हॅश्टॅग हटवला आहे.