मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. ती आज काँग्रेस अध्यक्ष राहुल यांची भेट घेणार असल्याचेही समजते. त्यानंतर आजच उर्मिलाची उमेदवारीही जाहीर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्यासोबत उर्मिलाची निवडणुकीच्या रिंगणात टक्कर असणार आहे.
उत्तर मुंबईतून भाजपविरोधात निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते फार उत्सूक नसल्याने एखाद्या कलाकारालाच मैदानात उतरविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप तरी उर्मिलाने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
उर्मिला आज यासंबंधीच्या चर्चेसाठी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेणार असल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. मागील वेळी याच जागेसाठी काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांचा ४ लाख मतांने पराभव झाला होता. याच कारणामुळे उर्मिलाला या जागेसाठी उमेदवारी देण्याचा विचार केला जात आहे. मुंबईमध्ये उर्मिलाचे भरपूर चाहते आहेत. याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता असल्यानं तिला याठिकाणी उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. या पूर्वीही या मतदारसंघातून काँग्रेसनेअभिनेता गोविंदा यास उमेदवारी दिली होती. तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा त्यांनी पराभव केला होता.