मुंबई - आतापर्यंतच्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता यंदाच वर्ष हे बॉलिवूडसाठी अधिक खास ठरेल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अवघ्या ६ महिन्यांत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी १०० कोटींचा गल्ला पार करण्यासोबतच अनेक नवीन रेकॉर्ड बनवले.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी २०१९ मधील टॉप ५ चित्रपटांची यादी शेअर केली आहे. या यादीत विकी कौशलच्या 'उरी' चित्रपटाने बाजी मारली आहे. तर शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' चित्रपट दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, 'कबीर सिंग'ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्यापही सुरूच असल्याने हा चित्रपट उरी चित्रपटालाही मागे टाकू शकतो.
बॉलिवूड भाईजानलाही कबीर आणि विकीने मागे टाकले असून सलमानचा 'भारत' चित्रपट तिसऱ्या स्थानी आहे. भारतपाठोपाठ अक्षय कुमारचा सारागढीच्या लढाईवर आधारित असणारा 'केसरी' चित्रपट आहे. तर यानंतर अजय देवगणच्या 'टोटल धमाल' चित्रपटाचा नंबर लागला आहे.