नवी दिल्ली - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने सर्वकाही ठप्प झाले आहे. याचा मोठ्या प्रमाणात चित्रपटसृष्टीलाही फटका बसला आहे. यावर आता यामी गौतमने प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटांच्या चित्रिकरणाला पुन्हा कधी सुरुवात होईल, याबद्दल काहीही कल्पना करता येत नसल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.
या विषाणूमुळे चित्रपटसृष्टीत होणाऱ्या बदलांविषयी तिने मत मांडले. यामी म्हणाली, चित्रपटसृष्टीतील अनेकांनी लॉकडाऊनपूर्वीच सिनेमे साईन केले आहेत. मात्र, आता या सिनेमांच्या बजेटवर पुन्हा काम होण्याची शक्यता आहे. चित्रपटगृहे कधी सुरू होतील, याबद्दल काहीही कल्पना नाही. अशात अधिक बजेट नसलेले चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणे शक्य असल्याने चित्रपटांच्या बजेटबद्दल पुन्हा विचार केला जाईल, असे तिने म्हटले.
यामी म्हणाली, सध्या माझ्याकडे येणाऱ्या चित्रपटांच्या ऑफरमध्ये बहुतेक चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारे आहेत. मात्र, चित्रपटांच्या चित्रिकरणाला सुरुवात कधी होणार याबद्दल काहीही सांगता येत नाही. कारण, लॉकडाऊन उघडले तरी कोरोनाचा संसर्ग केव्हा थांबेल याबद्दल काहीही कल्पना नाही. अशात कदाचित नवीन सूचना आणि नियनांनुसार चित्रिकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, असेही यामीने सांगितले.