हैदराबाद - तेलुगू अभिनेता आणि कॉमेडियन वेणू माधव यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी बुधवारी २५ सप्टेंबरला हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्यांचा सामना करीत होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबरला त्यांचे यकृत प्रत्यारोपण करण्यात येणार होते. याच कारणाने त्यांना रुग्णालयातून डिसचार्जही मिळाला होता. मात्र, प्रत्यारोपणापूर्वीच त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ताबडतोब पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून ते या समस्यांचा सामना करत असल्याने ते चित्रपटसृष्टीपासूनही दूर होते. वेणू यांनी १९९६ साली 'संप्रादयम' सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते, तर २०१६ मध्ये आलेल्या 'डॉ. परमनंद्याज स्टुडंटस्' या सिनेमात ते अखेरचे झळकले. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक उत्तम कलाकार हरपल्याचे म्हणत अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.