मुंबई : टी-सिरीजचे प्रमुख भूषण कुमार यांची गणना अव्वल क्रमांकाच्या निर्मात्यांमध्ये होते. भूषण कुमार यांचे टी-सीरीज बॅनर दरवर्षी डझनभर किंवा त्याहून अधिक चित्रपटांची निर्मिती करते. २०२० सारख्या कोरोना बाधित वर्षातसुद्धा टी-सीरिजमुळे प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन होत राहिले. नुकतीच फिल्मफेअरने नामांकने जाहीर केली. त्यात टी-सिरीजचे चित्रपट जास्तीत जास्त नामांकने घेऊन आघाडीवर आहेत. विविध श्रेण्यांमध्ये ५५ हून अधिक नामांकने मिळवल्यामुळे, या प्रॉडक्शन हाऊसने उत्तम चित्रपट निर्मिती आणि उत्कृष्ट कथा-कथनात एक नवीन ‘बेंचमार्क’ स्थापित केला आहे.
टी-सिरीज निर्मितीसंस्थेने मनोरंजनात्मक, व्यावसायिक आणि संकल्पनाभिमुख आशयघन चित्रपटांचे एक ‘पॅकेज’ दर्शकांना दिले आहे. चित्रपट निवडीमध्ये भूषण कुमार जातीने लक्ष घालतात त्यामुळे या नामांकनांचे सर्वाधिक श्रेय त्यांच्याकडे जाते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. थप्पड, तान्हाजी : द अनसंग वॉरियर, लूडो, शुभ मंगल ज्यादा सावधान, मलंग, स्ट्रीट डान्सर ३ सारख्या अनेक चित्रपटांनी फिल्मफेअरची नामांकने मिळवली आहेत. 'थप्पड' आणि 'शुभमंगल ज्यादा सावधान'ने तर अनुक्रमे १८ आणि १७ नामांकने मिळवली आहेत.
अनुभव सिन्हा दिग्दर्शित आणि तापसी पन्नू अभिनित 'थप्पड' हा एक मंत्रमुग्ध करणारा सामाजिक नाट्य दर्शवणारा चित्रपट होता. तर, अनुराग बासू दिग्दर्शित मल्टी-स्टारर 'लूडो' हा एक डार्क कॉमेडी सिनेमा होता. 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगण व सैफ अली खान अभिनीत ऐतिहासिक चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७५ कोटींची कमाई केली. हितेश केवालीया दिग्दर्शित आणि आनंद एल राय सहनिर्मित समलैंगिक विषयावरील शुभ मंगल ज्यादा सावधान हा चित्रपट कॉमेडी-ड्रामा, समाजातील निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयाबाबत भाष्य करण्याचा एक धीट प्रयत्न होता. 'मलंग' एक रोमँटिक थ्रिलर होता तर स्ट्रीट डान्सर ३डी हा नृत्याला वाहिलेला चित्रपट होता.
भूषण कुमारांच्या टी-सीरीजने प्रत्येक जॉनर हाताळला असून लो-ते-बिग बजेट चित्रपटांच्या निर्मितीत भाग घेतला आहे. टी-सिरीजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांनी नामांकने मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - 'सायना' पब्लिक रिव्ह्यू : प्रेक्षकांना भावली परिणीतीने साकारलेली सायना