मुंबई - अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. यासंबंधी आतापर्यंत दिग्दर्शक आदित्य चोप्रा , संजय लीला भन्साळी यांच्यासह सुशांतसिंग राजपूत याच्या कुटुंबातील सदस्यांची, जवळच्या मित्रांची, बॉलीवूडमधील वेगवेगळ्या नामवंत व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली आहे. यानंतर सोमवारी मुंबई पोलिसांकडून हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांची सांताक्रूझ पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सांताक्रूज पोलीस ठाण्यात आलेले महेश भट यांनी पोलिसांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत. यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्या मॅनेजरला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवले असून अभिनेत्री कंगना रनौत हिचाही जबाब नोंदवण्यासाठी तिला समन्स पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - सुशांतसिंह डिप्रेशनमुळे अनेकदा झाला होता अॅडमिट, रुमी जाफरे यांचा खुलासा
महेश भट यांनी लिहिलेल्या एक पुस्तकावर चर्चा करण्यासाठी सुशांत सिंग 2018 साली महेश भट यांना भेटला होता. 'सडक 2'या चित्रपटासाठी त्याची निवड झाली नसल्याचे महेश भट यांनी म्हटले आहे. या नंतर 2020 मध्ये पुन्हा दोघे एकत्र सुशांत सिंगच्या घरी भेटले होते.
दरम्यान , पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. या अगोदर सुशांतसिंगची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिने ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली होती. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नसून या प्रकरणी नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची विनंती रियाने ट्विटरच्या माध्यमातून केलेली आहे.