मुंबई - सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिने सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एम्सचे फॉरेंसिकचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे सीबीआयला दिलेल्या अहवालाच्या संदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.
श्वेताने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली असून सुशांतच्या मृत्यूसंबंधी चौकशीबाबतच्या भूमिकेतील बदलाबद्दल विचारणा करीत न्यूज चॅनेलच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. श्वेताने लिहिलंय, ''अशा प्रकारे यू- टर्न घेतल्याबद्दल स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे!!! का?'' असे लिहित श्वेताने एम्सच्या अहवालावर आक्षेप घेतला आहे.
एका वृत्तवाहिनीने ऑडिओ टेप जारी केली होती. यात डॉ. गुप्ता यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. मुंबईतील कपूर रुग्णालयाला अनेक प्रश्न विचरले होते आणि मुंबई पोलिसांनी गुन्हेगारीच्या घटनास्थळाचे संरक्षण कसे केले नाही, याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
सीबीआयच्या विनंतीवरून ऑगस्टमध्ये सुशांत सिंहच्या मृत्यूसंदर्भात वैद्यकीय-कायदेशीर मत देण्याच्या कामी मदत करण्यासाठी डॉ. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एम्स फॉरेन्सिक पॅनेलची स्थापना करण्यात आली होती.
एम्समधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिला आहे. अशा प्रकारे सुशांतच्या परिवाराने आणि वकिलाने केलेला, विष देण्यात आल्याचा आणि गळा घोटून मारल्याचा दावा फोल ठरला आहे.
सुशांत सिंह 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील माँट ब्लँक अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतचा खून झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी उपस्थित केला होता.