मुंबई - एम.एस धोनी आणि केदारनाथसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांवर छाप उमटवणारा सुशांत लवकरच आता आणखी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून यात तो श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
हॅपी छिछोरे असं कॅप्शन देत सुशांतनं सेटवरील हा फोटो शेअर केला आहे. साजिद नाडियादवाला निर्मित ‘छिछोरे’ या चित्रपटाची प्रस्तुती फोक्स स्टार स्टुडिओज करत आहे. येत्या ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या सुशांत आणि श्रद्धा ‘छिछोरे’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने श्रद्धा आणि सुशांत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूतशिवाय वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नविन पोलीशेट्टी, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला आणि प्रतिक बब्बर देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.