मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने त्याच्या मुंबईतील वांद्रा पाली हिल स्थित राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. सुशांतने आत्महत्या का केली याबद्दलची कुठलीही माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. ज्याठिकाणी सुशांतने आत्महत्या केली ते घर त्याने सहा महिन्यांपूर्वी 3 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते.
सुशांतने या घरासाठी 36 महिन्यांचा करारनामा केला होता. हा करार डिसेंबर 2022 पर्यंत होता. त्यासाठी त्याने 12 लाख 90 हजार रुपये डिपॉझिटसुद्धा भरले होते. पहिल्या वर्षासाठी तब्बल चार लाख 50 हजार रुपये भाडे यावेळी ठरविण्यात आले होते. दुसऱ्या वर्षासाठी 4 लाख 60 हजार आणि तिसऱ्या वर्षासाठी 4 लाख 72 हजार भाडे भरण्याचा करार करण्यात आला होता.
3600 सक्वेअर फुटांच्या या दुमजली घरात तो एकटाच राहत होता. दरम्यान, अभिनेत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सुशांत सिंगच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तींची चौकशी पोलीस करत आहेत. सोबतच गेल्या काही दिवसात अभिनेत्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या मित्रांची चौकशीही पोलीस करत आहेत.