मुंबई - 'बिग बॉस' तेलुगूच्या तिसऱ्या सीजनला २१ जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरूवात होत आहे. हा शो प्रसिद्ध अभिनेता अक्किनेनी नागार्जुन होस्ट करणार आहे. मात्र, हा शो सुरू होण्यापूर्वीच शोवर बंदी घालण्याची मागणी करत उस्मानिया विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नागार्जूनच्या घराबाहेर निदर्शनं केली.
याच कारण असं, की काही दिवसांपूर्वीच दोन महिला स्पर्धकांनी या शोच्या आयोजकांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर असं वृत्त समोर येत होतं, की शोचं प्रेक्षपण लांबणीवर टाकण्यात आलं आहे. मात्र, आता हा शो वेळेवरच सुरू होणार असून नागार्जूनने प्रीमियरचे एपिसोडही शूट केले असल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर या शोवर बंदी आणण्याची मागणी करत विद्यार्थ्यांच्या संघटनेनं नागार्जूनच्या घराबाहेर निदर्शनं केली.
विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाने म्हटलं की, नागार्जून या गंभीर आरोपांबद्दल काहीच का बोलत नाही? काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतः म्हटलं होतं, की बिग बॉस एक वाईट शो आहे आणि आज तोच व्यक्ती हा शो होस्ट करतोय. या सर्व प्रकरणावर बोलण्याऐवजी नागार्जून शांत का बसला आहे? असा सवाल संघटनेच्यावतीने करण्यात आला. दरम्यान याविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून शोचं प्रेक्षपण थांबवण्याची मागणी यात केली गेली आहे.