मुंबई - कोरोना काळात अनेक बाधितांचे अनुभव ऐकून बऱ्याच जणांना या आजाराची अधिकच भीती वाटू लागली आहे. त्यातच या महामारीने अनेकांचे जीव घेतले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात भीती दडी मारून बसली आहे. कोरोनाची दुसरी लाट तर महाभयंकर असून प्रत्येकजण फक्त या आजारापासून कसे वाचायचे याचाच विचार करताना दिसत आहे. त्यामुळे स्ट्रेस वाढला असून अनेक जण हृदयविकाराचे झटके येऊन मृत्यू पावत आहेत. नुकताच मनोरंजनसृष्टीतील ख्यातनाम ‘स्टील फोटोग्राफर’ सुधाकर मुणगेकर यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले आहे.
वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून काम
सिने स्थिरछायाचित्रकार अविवाहित सुधाकर मुणगेकर ७३ वर्षांचे होत. अनेक वर्षे ते एकटेच राहत होते. दामोदर कामत स्थापन केलेल्या 'कामत फोटो फ्लॅश' या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८ व्या वर्षी ते फोटोग्राफर म्हणून रुजू झाले. ते वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून काम करीत होते. कन्टीन्यूटी फोटोग्राफीमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शीत 'सखी माझी', कुमार सोहनी दिग्दर्शित 'जोडीदार', 'तुझ्याचसाठी' अशा अनेक मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांसाठी त्यांनी स्थिरचित्रण केले आहे.
दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे केले काम
तसेच राज कपूर यांच्या आरके बॅनरनिर्मित 'मेरा नाम जोकर', 'बॉबी', 'सत्यम शिवम सुंदरम', 'प्रेम रोग', 'धरम करम', 'हिना' तसेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'अखियोंके झरोखेसें', 'नादिया के पार', 'सारांश', 'उपहार', 'गीत गाता चल', 'चितचोर', 'मैने प्यार किया', एन. चंद्रा यांच्या 'नरसिंहा'सह जवळपास दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे काम केले आहे.
अनेक दिग्गजांसोबत केले काम
राज कपूर साहेब, देव आनंद, राजश्री प्रॉडक्शन्सचे बडजात्या, अभिनेत्री नर्गिस, मधुबाला, दिग्दर्शिका सई परांजपे, दामू केंकरे, एन. चंद्रा, श्रीकांत ठाकरे, कुमार सोहनी, सुभाष फडके अशा अनेक दिग्गजांसोबत सुधाकर मुणगेकर यांनी काम केले होते. त्यांच्या अनेक चित्रपटांचे स्थिरचित्रण त्यांनी केले होते. मितभाषी असलेल्या सुधाकर मुणगेकर यांचे मा. भगवान दादासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी स्नेहपूर्ण संबंध होते.
हेही वाचा - किरण खेरबद्दल नकारात्मक अफवा पसरवू नका, अनुपम खेर यांचे आवाहन