मुंबई - रोमान्सचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान आज मंगळवारी 56 वर्षांचा झाला. त्याचे फॅन्स आणि अनुयायी त्याची एक झलक पाहण्यासाठी मन्नत बंगल्याच्या बाहेर जमा झाले होते. दरवर्षी हे फॅन्स देशभरातून मन्नतच्या बाहेर जमा होतात. केक, फुगे आणि इतर डेकोरेशनसह फटाके वाजवून ते किंग खानचा वाढदिवस साजरा करतात. त्यांना अभिवादन करण्यासाठी शाहरुखही बाल्कनीत येतो आणि त्यांचे आभार मानतो. मात्र यंदाचा त्याचा वाढदिवस तसा असणार नाही.
यावर्षी शाहरुख आपला वाढदिवस एकांतात, केवळ कुटुंबासोबत साजरा करणार असल्याचे मीडिया रिपोर्टवरुन समजते. त्याच्या बंगल्याच्या बाहेर कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करम्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, त्यांच्याकडे शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी यांचा एक मेसेज आहे. ज्यानुसार शाहरुख खान, त्याचा मुलगा आर्यन खान आणि कुटुंबातील इतर सदस्य अलिबाग येथील त्याच्या फार्महाऊसवर आहेत.
आर्यनची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शाहरुख त्याच्या अलिबागच्या घरी वेळ घालवत आहे, या वृत्तानंतर ही बातमी आली आहे.
30 ऑक्टोबर रोजी आर्यन खान आर्थर रोड सेंट्रल जेल (ARCJ) मधून बाहेर पडला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला क्रूझ वरुन ड्रग प्रकरणी अटक केली होती. 26 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला अखेरीस जामीन मिळाला आहे. या काळात शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबीयांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला होता.
हेही वाचा - Hbd Aish : निळ्या डोळ्यांची सौंदर्यवती ऐश्वर्या राय झाली 48 वर्षांची