मुंबई - अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून स्थलांतरित मजूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. अनेकजण त्याच्या या कामासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही करत आहे. मात्र, काही लोक आता याचा गैरफायदा घेत आहेत. सोनूच्या नावाने कामगारांना घरी पोहोचवण्याचे आमिष देत पैसै उकळण्याचे काम काही लोक करत आहेत. अशांना सोनू सूदने इशारा दिला आहे.
माझ्या नावाने मदत करण्याचे सांगत कोणी तुमच्याकडे पैशांची मागणी करत असल्यास त्वरित मला कळवा असे सोनूने म्हटलं आहे. सोनू सूदने ट्विट केलं, की मित्रांनो, आम्ही कामगारांना जी सेवा देत आहे, ती पूर्णपणे मोफत आहे. तुम्हाला जर कोणी माझे नाव सांगून पैसे मागितले तर तात्काळ नकार द्या आणि याबद्दल मला किंवा पोलिसांना माहिती द्या.
दुसऱ्या ट्विटमध्ये सोनूने व्हॉट्सअॅपवरील चॅटचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यात काही संधीसाधू लोक कामगारांकडे पैशांची मागणी करत आहेत. हे फोटो शेअर करत काही लोक या कामगारांच्या परिस्थितीचा फायदा घेत असल्याचे अभिनेत्याने म्हटलं आहे.
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कामगारांना घरी पोहोचवण्यासोबतच सोनूने नुकतंच 28 हजार गरजूंना अन्न वाटप केलं आहे. तसेच बुधवारी महाराष्ट्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळावेळी त्याने अनेकांची शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राहाण्याची व्यवस्थाही केली आहे. सोनूच्या या कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, स्मृती इराणी, अमरिंदर सिंग आणि अमर पटनाईक यांच्यासह अनेकांनी त्याचे कौतुकही केले आहे.