मुंबई - ‘सारेगमप’ म्हटलं की स्पर्धक, परीक्षकांच्या बरोबरीनेच आठवतो तो स्पर्धकांना दमदार साथ करणारा वाद्यवृंद. अंताक्षरी स्पर्धा ते रिअॅलिटी शो हे स्थित्यंतर अनुभवलेल्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्रसिद्ध संगीत संयोजक कमलेश भडकमकर! सांगीतिक स्पर्धाच्या गर्दीतही स्वत:चं स्थान कायम राखणाऱ्या ‘सारेगमप’च्या लोकप्रिय वाद्यमेळाचं सुकाणू पहिल्या पर्वापासून त्यांच्याच हाती आहे. ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ हे नवं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.
![सारेगमप लिट्ल चॅम्प्स](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12452274_bhadkamkar.jpeg)
‘सारेगमप’ने वादकांना ओळख मिळवून दिली. त्याविषयी कमलेश सांगतात, "सारेगमपमध्ये एवढी गाणी सादर झाली आहेत की आज आमच्या ग्रुपकडे साधारण आठ-दहा हजार गाण्यांची नोटेशन्स तयार आहेत. त्याचा आम्हाला आता खूप फायदा होतो. झी मराठी आणि ‘सारेगमप’ने वादकांना घराघरांत पोहोचवलं." ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या यंदाच्या पर्वात छोटय़ा वादकांनाही संधी देण्यात आली आहे. पण एवढी लहान मुलं आणि एवढी मोठी जबाबदारी, म्हटल्यावर त्यांची तयारी करून घ्यावीच लागत असणार. त्याबद्दल कमलेश म्हणाले, "लिट्ल चॅम्प्सचं पहिलं पर्व आणि आताचं पर्व यामध्ये १२ वर्षांचा काळ लोटला आहे. पर्वागणिक काही तरी वेगळं असायला हवं आणि ते नावीन्य आपल्याला झेपायलाही हवं. वादक म्हणून लहान मुलांना संधी देणं हा असाच एक अनोखा प्रयोग! प्रसिद्ध वादकांबरोबर वाजवताना लहान मुलांवर दडपण येणं स्वाभाविकच होतं. शिवाय मोठे वादक वाजवतायत आणि कॅमेरा छोट्यांवर आहे, असं आम्हाला होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. त्याच वेळी तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सर्व जण आहोतच, असं आश्वस्तही केलं. वादनाचा सराव सुरू असतोच. खरं तर मुलं लहान असली, तरी त्यांच्यात वादकांचा आत्मा आहे. ती नेहमीच छान वाजवतात, पण इथे स्पर्धात्मक वातावरण आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक तयारीने उतरावं लागेल, याचं भान त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न आहे. ‘सारेगमप’ हे एकही रीटेक न घेण्याबद्दल ओळखलं जातं आणि सांगताना आनंद वाटतो की छोटे वादक असूनही या पर्वातसुद्धा अद्याप एकही रिटेक झालेला नाही. आजवर ‘सारेगमप’ची १४ पर्व झाली. स्पर्धक लहान असोत वा मोठे; आम्ही रिटेक घेत नाही हे मी अतिशय ठामपणे सांगू शकतो."
![सारेगमपचा वाद्यवृंद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12452274_saregamapa.jpeg)
हेही वाचा - जून : नैराश्यावर संवादातून सहज मात करता येते हे दाखविणारा चित्रपट