मुंबई - गेल्या वर्षीपासून ओटीटी प्लॅटफॉर्म्सची चलती सुरु आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशभर चित्रपटगृहे बंद होती आणि काही राज्यांमध्येही अजूनही तीच स्थिती आहे. त्यामुळेच, कदाचित, डिजिटल प्लॅटफॉर्म्सची ‘वट’ वाढली. काही चित्रपट प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वेब सिरीजचा डिमांड वाढला. त्यामुळे नवनवीन वेब सिरीज बनू लागल्या आणि नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म्स उदयास आले. त्यातलाच एक म्हणजे 'पिंग पॉंग’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म.
संतोष जुवेकर येतोय 'हिडन' मधून महाराष्ट्रातील प्रसिद्ध उदयोजक जीवन बबनराव जाधव यांनी 'पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ द्वारे 'पिंग पॉंग’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म खास जगभरातील भारतीय प्रेक्षकांसाठी लॉंच केला आहे. या ओटीटीवर अत्यंत वेगळ्या आणि आकर्षक नव्या वेबसिरीज, वेब मुव्हीज, बॉलिवूड, हॉलिवूड मुव्हीज तसेच इतर एंटरटेन्मेन्ट शोज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. 'पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.'च्या 'पिंग पॉंग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच येऊ घातलेल्या 'हिडन' या नव्या भव्य वेबसिरीज येऊ घातलीय. कलाकारांच्या उपस्थितीत सोशल मीडियावर 'हिडन'चे पोस्टर रिलीज करण्यात आले. विशाल सावंत दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये मराठीतील आघाडीचा अभिनेता संतोष जुवेकर प्रमुख भूमिकेत दिसेल. 'हिडन' मध्ये नेमकं ‘लपलेलं’ काय आहे याविषयी लेखक दिग्दर्शक विशाल सावंत म्हणाले, "ही एक डार्कशेड असलेली मुंबई शहरातील गोष्ट आहे. हिडन मधील सर्व व्यक्तिरेखा काल्पनिक असून गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी आहे. हिडन या नावावरूनच कळते की यात काहीतरी हिडन आहे. पण नेमकं काय लपलेलं आहे ते कळण्यासाठी प्रेक्षकांनी या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहणं गरजेचं आहे. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील साप-मुंगूस प्रकारच्या वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील. डार्कलूक असलेलं 'हिडन'चं पोस्टर कुतुहलासोबतच तीव्र उत्सुकता तयार करीत आहे.
"लोकप्रिय अभिनेते संतोष जुवेकरांची 'हिडन' या वेबसिरीज मध्ये प्रमुख भूमिका आहे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले "माझी 'हिडन'मध्ये अत्यंत वेगळी भूमिका आहे. यात मी एसीपी प्रदीप राजे ही भूमिका साकारत आहे. हा अनुभव माझ्यासाठी रोमांचक आहे. प्रचंड मेहनत घेऊन आमच्या टीमने ही वेब सिरीज तयार केली आहे. आज 'हिडन'चं नुसतं पोस्टर प्रदर्शित झालंय, आणि ते पाहून प्रेक्षकांनी कमाल प्रतिक्रिया दिल्यात, आमच्या मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान मिळत आहे. 'हिडन' मध्ये दडलंय काय? मला पक्की खात्री आहे, 'हिडन' सर्वांना या ओटीटी प्लॅटफॉर्मवर खिळवून ठेवेल".'हिडन' वेबसिरीज बाबत बोलताना या वाहिनीचे सर्वेसवा सीएमडी जीवन बबनराव जाधव म्हणाले, "'हिडन' ही भव्य वेबसिरीज आहे. अनेक नामांकित कलावंतांच्या या वेब सिरीजमध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. 'सस्पेन्स, थ्रीलर, ऍक्शन प्रकारातील ही थरारक वेबसिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल.
"'पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ साठी विशाल पी. सलेचा आणि महेश पटेल यांनी 'हिडन' ची निर्मिती केली असून विशाल सावंत यांनी या वेबसिरीजचे लेखन दिग्दर्शन केले आहे. कमल सिंग यांचे छायांकन असून रसीद खान यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. 'हिडन' मध्ये संतोष जुवेकर, संजय सोनू, दक्ष अजित सिंग, जीत सिंग, मानवीर चौधरी, रजत वर्मा, रोहित परशुराम आणि संदीप पाठक यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. गहन रहस्याची उकल करणारे चेहरे ‘हिडन’ च्या पोस्टरवर दिसत असून सोशल मीडियावर हे पोस्टर रिलीज होताच नेटकऱ्यांमध्ये कमालीचे कुतूहल तयार झाले असून त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या १६ जुलै रोजी ही वेबसिरीज 'पिंग पॉंग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हेही वाचा - अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्य मलायकाने पोस्ट केला रोमँटिक फोटो