मुंबई - सई ताम्हणकर हे नाव आता महाराष्ट्रासह देशभरात घराघरात पोहोचले आहे. 'लव्ह सोनिया' या बॉलिवूड चित्रपटामुळे देशभर कौतुक वाट्यास आलेली सई आता क्रिती सेनॉनसोबत 'मिमी' या बॉलिवूड चित्रपटात काम करीत आहे.
'मिमी' हा चित्रपट लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित करीत आहेत. निर्माता दिनेश विजान हा चित्रपट 'मडॉक फिल्म'साठी बनवित आहेत. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटाचा 'मिमी' हा हिंदी रिमेक आहे.
'मिमी' चित्रपटात क्रिती सेनॉन ही सरोगसी मदरची भूमिका साकारत आहे. यात सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाचे मांडवा, जयपूर येथे शूटिंग शेड्यूल पार पडले. या दरम्यान सईचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. पायाला प्लास्टर घालण्यापूर्वी तिला हे शूटिंग पूर्ण करायचे आहे.
सध्या जगभर कोरोना व्हायरच्या प्रभावामुळे बॉलिवूड चित्रपटाची शूटिंग १९ मार्च पासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे 'मिमी'चे शूटींग सध्या वेगात सुरू आहे. आपल्यामुळे शूटींग रद्द होऊ नये यासाठी सई जखमी असतानाही शूटिंग करीत आहे. १८ मार्चच्या रात्रीपासून शूटिंग थांबवण्यात येणार आहे. मर्यादित वेळेमध्ये शूट पूर्ण करण्यासाठी सईने रात्रंदिवस शूट करण्याचा निर्णय घेतलाय. सेटवरील सर्व तंत्रज्ञ, कर्मचारी यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. पायाला प्रॅक्चर असताना सई शूट करत असल्यामुळे सगळेच जण तिचे कौतुक करीत आहेत.
सईने या वर्षाची सुरूवात 'धुरळा' या चित्रपटाच्या रिलीजने केली होती. तिचा आगामी 'अश्लिल उद्योग मित्रमंडळ' हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रार्दुर्भावामुळे रिलीज लांबणीवर पडले आहे.