मुंबई - माजी ब्युटी क्वीन मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुपरस्टार अक्षय कुमारसोबत चित्रपटाच्या सेटवर जाण्यासाठी मी उत्सुक असल्याचे तिने म्हटलंय. पृथ्वीराज या आगामी ऐतिहासिक चित्रपटाद्वारे मानुषी अक्षयसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मानुषी म्हणाली, "पृथ्वीराज'च्या सेटवर परत येण्यास मला आनंद झाला आहे, कारण हे जगणे मी खूप मिस केले होते. मी प्रत्येक दिवशी शूट करायला तयार आहे, कारण मी बरेच काही शिकत आहे आणि मला ते आवडतं. अक्षय सरांसोबत सेटवर जाण्यासाठी मी खूप उत्सुक होते, कारण त्याच्याकडून मी बरेच काही शिकले आहे आणि बरेच काही शिकायचेही बाकी आहे."
मानुषीने खुलासा केला की, अक्षयने तिला कामासाठी खूप प्रोत्साहन दिले आणि यासाठी तिने त्याचे आभारही मानले आहेत.
ती म्हणाली, "मी टीमबरोबर काम करण्यास स्वतःला भाग्यवान समजते आणि प्रत्येकाने मला सहकार्य केले आहे. जेव्हा तुम्ही पदार्पण करीत असता, तेव्हा हे कठीण असते. कारण तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत असता. अक्षय सरांसह प्रत्येकजण खूप सहकार्य करतात आणि उत्साह वाढवतात.''
पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आणि पराक्रमावर आधारित 'पृथ्वीराज' हा चित्रपट आहे. देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाचा बराचसा भाग शूट झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करीत आहेत.