‘प्रेम नाम हैं मेरा, प्रेम चोपडा’ हा अभिनेता प्रेम चोप्रा यांचा ‘बॉबी’ चित्रपटातील संवाद त्या चित्रपटाएवढाच फेमस झाला होता आणि तो त्यांच्या नावाला कायमचाच चिकटला. या डायलॉगची आठवण होण्याचे कारण म्हणजे खुद्द प्रेम चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदकविजेता नीरज चोप्रासाठी एक खास व्हिडिओ मेसेज पाठविला आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या, आणि कोरोना महामारीमुळे वर्षभर पुढे ढकलल्या गेलेल्या आणि होतोय की नाही अशी टांगती तलवार असलेल्या ऑलिम्पिक खेळांत अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले वहिले सुवर्णपदक मिळाले आणि ते मिळवून देणारा खेळाडू आहे नीरज चोप्रा. भालाफेकीत त्याने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्याने ८७.५८ मी. लांब भाला फेकत हा विजय मिळविला. खरेतर हे पदक भारताच्या नावावर जरी असले तरी त्याचे श्रेय फक्त आणि फक्त नीरज चोप्रा आणि त्याचा कोच व सपोर्ट स्टाफला जाते. आपल्या देशात, क्रिकेट वगळता, कुठल्याही खेळाला फारसा प्रतिसाद किंवा पाठिंबाही मिळत नाही. आपल्याकडे सुरुवातीपासूनच कुठलेली स्पोर्ट्स-धोरण नाहीये. इतर देशांत खेळाडू घडविले जातात तसे आपल्या देशात घडविले जात नाहीत. अनेक खेळात प्राविण्य आणि पदके पटकावणारे खेळाडू स्वतःच्या हिमतीवर, कठोर परिश्रम करून आलेले असतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा.
नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यावर अख्खा देश आनंदात न्हाऊन निघाला. सर्व बाजूने अभिनंदनाचा वर्षाव झाला. पंतप्रधान, इतर राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटीजनी नीरजचे अभिनंदन केले. चोप्रा आडनाव कॉमन असल्यामुळे अभिनेता प्रेम चोप्रा यांना थोडा जास्तच आनंद झाला आणि तो त्यांनी खास नीरजसाठी बनविलेल्या अभिनंदन-व्हिडिओत झळकताना दिसतोय. तसेच सलमान खान, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, वरुण धवन, अनिल कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, करिना कपूर खान, अनुष्का शर्मा, आयुष्मान खुराना, सोनू सूद, जॉन अब्राहमसारख्या अनेक सेलिब्रिटीजनी नीरजचे कौतुक केले. सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या व भारत वि. इंग्लंड कसोटी सामन्याचे समालोचन करणाऱ्या ‘लिटिल मास्टर’ सुनील गावसकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एकच जल्लोष केला आणि ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती’ हे गाणे गात नीरजच्या विजयाचा आनंद साजरा केला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात जास्त पदके मिळविली गेली आहेत आणि उत्तरोत्तर ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रासारखे खेळाडू भारतीय तरुणांना क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांकडे आकृष्ट करतील अशी आशा सर्व स्तरांवर व्यक्त होताना दिसतेय.