मुंबई - बॉलिवूडचा दबंग खान सलमान याच्या आगामी राधे या सिनेमात अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडेदेखील झळकणार आहेत. तरडे यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या सिनेमासाठी 10 ते 12 दिवस शूटिंग केल्याचं तरडे यांनी सांगितलं आहे. सिनेमातील आपली भूमिका वेगळी असून ती प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी प्रेक्षक तरडेंना त्यांच्या देऊळ बंद आणि मुळशी पॅटर्न या सिनेमामुळे ओळखतात. तरडे यांच्या मुळशी पॅटर्न या सिनेमाचा खास शो अरबाज आणि सोहेल खान यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या दोघांना हा सिनेमा आवडल्यानंतर त्यांनी सलमान खानला तो पाहण्याचा आग्रह केला. सलमानला हा सिनेमा एवढा आवडला, की त्याने आयुष शर्माला घेऊन या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार नाहीत.
मूळ कथा तरडे यांचीच असल्याने अनेकदा त्यांची आणि सलमान खानची भेट होत असे. यादरम्यान त्यांच्यात झालेल्या मैत्रीमुळेच राधे या सिनेमातील एका छोट्या पण खास भूमिकेसाठी सलमान खानला तरडे यांची आठवण आली आणि तरडे या सिनेमात कास्ट झाले. सलमानसोबत काम करण्यात एक वेगळीच मजा आहे, असं तरडे यांनी म्हटलं आहे. तो जरी हिंदी बोलत असला तरीही मनाने तो अस्सल मराठीच आहे, अशी कॉम्प्लिमेंट तरडे यांनी सलमानला दिली आहे.
'राधे' या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केलं असून त्यात सलमान खान, दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. रमजाननंतर ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज करण्याची सलमान खानची इच्छा होती. मात्र, लॉकडाऊनमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता राधे नक्की कधी रिलीज होतो आणि खतरनाक तरडेंचा बॉलिवूड डेब्यु नक्की किती खतरनाक ठरतो याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.