मुंबई - 'एम.एस धोनी' आणि 'केदारनाथ'सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांवर छाप उमटवणारा सुशांत लवकरच 'छिछोरे' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून यात तो श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या पोस्टर शूटचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये चित्रपटाचं पोस्टर शूट करताना चाललेली कलाकारांची धमाल पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नविन पोलीशेट्टी, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.
साजिद नाडियादवाला निर्मित ‘छिछोरे’ या चित्रपटाची प्रस्तुती फोक्स स्टार स्टुडिओज करत आहे. तर नितेश तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. येत्या ३० ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने श्रद्धा आणि सुशांत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.