मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी 'वन डे' या चित्रपटात ते भूमिका साकारत आहेत. नुकताच या चित्रपटाचा मनोरंजक आणि रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या ट्रेलरमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात हात असणाऱ्या गुन्हेगाराच्या शोधात असलेल्या पोलिसांची आणि वकिलांची धडपड पाहायला मिळते. यात ईशा गुप्ता एका धाडसी पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. तर अनुपम यांनी वकिलाची भूमिका साकारली आहे.
चित्रपटातील अनुपम यांचे नोकरी से रिटायर हूँ जिंदगी से नहीं यासारखे डायलॉग प्रेक्षकांची मने जिंकणारे आहेत. अशोक नंदा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनुपम खेर यांचा हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती केतन पटेल आणि स्वाती सिंग यांनी केली आहे.