मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल याच्या घरी आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने छापा टाकला आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालच्या प्रियसीच्या भावाला अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता बॉलिवूडमधील ड्रग सिंडिकेट प्रकरणात एनसीबीच्या रडारवर अर्जुन रामपाल असल्याचे कळत आहे.
नायजेरियन तस्कराकडून मिळालेल्या माहितीवर कारवाई..
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून बॉलिवूडमधल्या ड्रग्स सिंडिकेटच्या संदर्भात तपास केला जात आहे. यामध्ये बॉलीवूड टीव्ही कलाकारांना अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या तस्करांना अटक करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली होती. या तस्कराची चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या संपर्कात क्षितिज प्रसाद आणि अॅजिसिलाओस (अर्जुनच्या प्रेयसीचा भाऊ) हे दोन आरोपी सतत संपर्कात होते अशी कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांना आणखी एका प्रकरणामध्ये अटक दाखवण्यात आलेली आहे.
घरी उपस्थित नव्हता अर्जुन रामपाल
अर्जुन रामपालच्या घरी मारलेल्या छाप्यादरम्यान अमली पदार्थ मिळाले की नाही याची माहिती अद्याप देण्यात आली नाही. या कारवाईच्या वेळी अर्जुनच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. ड्रग्जसंदर्भात काही आक्षेपार्ह वस्तू किंवा कागदपत्रे सापडतात का याचा शोध घेण्यात आला. या कारवाईदरम्यान अर्जुन रामपाल घरात उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. कारवाई झाली तेव्हा त्याच्या घरी कोणकोण उपस्थित होते याची माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा : मुंबईत पाच ठिकाणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे छापे; एकाला अटक
अर्जुन रामपाल-गॅब्रियेलाच्या घरी नुकतेच नव्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून तो गॅब्रियेला डिमेट्रीयाडीस हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तेव्हापासून त्यांच्या नात्यासंदर्भात जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अशात आता अर्जुन रामपाल आणि गॅब्रियेलाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रियेलाने मुलाला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने गॅब्रियेलासोबतचा एक फोटो शेअर करून ते त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. यानंतर गॅब्रियेलाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.